मुंबई (वृत्तसंस्था) पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरनंतर आता घरगुती वापराची वीज सुद्धा महागणार आहे. राज्यात विजेच्या दरात किमान ६० पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने लाईट बिल तब्बल २०० रुपयांनी महागणार ही आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. याआधीच राज्य सरकारने राज्यात विजेच्या दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. दरम्यान, वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने १५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. मात्र, तो निधी २०२१ मध्येच संपला असल्याची माहिती आहे. त्यामुळे महावितरणने १ एप्रिल २०२२ मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. कोळसाटंचाई, त्यामुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे ‘महावितरण’चा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे.
महानिर्मिती सात औष्णिक वीज प्रकल्पांतील ३० संचांद्वारे वीजनिर्मिती करते. या संचांमधील वीज विक्रीचा जुलै महिन्यात किमान २.४६७ रुपये ते कमाल ४.९५७ रुपये प्रति युनिट असलेला दर ऑगस्ट महिन्यात किमान २.८३७ रुपये ते ५.४६७ रुपये प्रति युनिटवर पोहोचला. या सर्व स्थितीमुळे कंपनीला सप्टेंबरअखेरपर्यंत ३४ हजार ८०६ कोटी रुपयांचा वीज खरेदी खर्च आला असून तो १३ टक्के अधिक असल्याचे ‘महावितरण’ने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला याआधीच कळविले आहे. ही सर्व वसुली ग्राहकांकडूनच होणार आहे.