किरकटवाडी (वृत्तसंस्था) सिंहगड रस्त्यावरील गोहे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून सदर महिलेने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज हवेली पोलीसांनी वर्तवला आहे.
रंगोली भास्कर वडावराव (रा. सर्व्हे नं. ५१,धानोरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आली व एक दिवस राहणार असल्याचे सांगितले. एकट्या व्यक्तीस रुम देण्यात येत नसल्याचे महिलेला सांगितले तेव्हा, माझ्या बरोबर जे राहणार आहेत त्यांना यायला थोडा वेळ लागणार आहे असे महिलेने सांगितले. तशी नोंद रजिस्टरमध्ये करून महिलेचे ओळखपत्र जमा करून घेण्यात आले.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वेटरने ही महिला ज्या खोलीत होती तेथे काही हवे आहे का हे विचारण्यासाठी फोन लावला असता फोन उचलला नाही. त्यामुळे वेटरने दरवाजा वाजवला तरीही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वेटरने ही बाब मॅनेजरला सांगितली असता शंका आल्याने मॅनेजरने हॉटेल मालकाला बोलावून घेतले. हॉटेल मालकाने तात्काळ हवेली पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला असता संबंधित महिला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार रामदास बाबर अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तिने दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. तिला पहिल्या पतीपासून एक सात वर्षाचा मुलगा आहे. सध्या ती माहेरी आई-वडीलांकडे राहत होती.