कोल्हापूर (वृत्तसंस्था) पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गंभीर दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.
सचिन वाझे प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी केली जात असताना आता राज्यातले अजून एक मंत्री संकटात असून त्यांचा देखील राजीनामा आज-उद्या होईल, असा गंभीर दावा भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सचिन वाझे प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
सचिन वाझे प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. “वाझेंच्या विषयात दोन एजन्सी काम करत आहेत. या प्रकरणाची खूप लांबपर्यंत मुळं गेली आहेत. ती खणून काढण्यात एनआयए आणि एटीएस यशस्वी होतील. आज संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या घटना घडतील. एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. दुसऱ्याचा कधीही होईल अशी परिस्थिती आहे. आणि तिसऱ्याचा आज-उद्या व्हायला हवा”, असं पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वीच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अनिल देशमुख विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. त्यात पुन्हा अजून एक मंत्री राजीनामा देण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.