बुलढाणा (वृत्तसंस्था) बुलढाण्यातील मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरनाथ यात्रा करून हिंगोली कडे परतणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्स क्रमांक (MH 08- 9458) तर नागपूरकडून नाशिककडे जात असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्स क्र. (MH 27 BX 4466) या दोन्ही वाहनांचा चा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झाले असून दोन्ही ट्रॅव्हल्स मध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी २५ जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर मलकापूरजवळ ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महिनाभरातच बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसचा दुसरा भीषण अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्व मृत हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. मृतकांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या घटनेत गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली चमूने शर्थीचे उपचार केले. मात्र २५ जणांपैकी ५ जण डोक्यात व पोटावर गंभीर जखमा झाल्याने अत्यवस्थ झाले होते त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून मयत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत.
















