नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात आक्रोश निर्माण करणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणात रोज नवे धक्के बसत आहेत. आता या प्रकरणात आणखी एक चक्रावणारा खुलासा करण्यात येत आहे. तो म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या घरात एक महिला तिची नातलग म्हणून राहात होती. या खोट्या नातलग महिलेचे नक्षलवाद्यांशी लागेबांधे होते व ती आता फरार झाली आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
दरम्यान, ही नातलग महिला स्वत:ला पीडितेची वहिनी असल्याचे सांगत होती. त्यामुळे तिच्या नावाने सोशल मीडियावर नक्षल भाभी म्हणून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. बलात्कार झालाच नव्हता ते हे एक रचलेले कारस्थान आहे येथपर्यंत अनेक दावे उत्तर प्रदेश पोलिसांकडून या केसमध्ये झाले आहेत. आता हे नवे नक्षल भाभी प्रकरण आल्यामुळे पोलिसांची कारस्थानची थिअरी बरोबर आहे का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. तसेच कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही काहींनी सोशल मीडियावर लक्ष्य केले आहे.
भारतीय जनता पार्टीची सोशल ब्रिगेडही या घडामोडीनंतर सक्रिय झाली आहे. माजी खासदार गीता कोटपल्ली यांनी प्रियांका गांधी यांचा व्हायरल झालेला फोटो शेअर करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. या फोटोतील महिला कोण आहे? ती पीडितेची आई नाही, तर मग घरात घुसलीच कशी? प्रियांका गांधी यांनी तिला गळाभेट घेउच कशी दिली, तसेच बरखा दत्त यांनी संबंधित महिलेची मुलाखत घेतली होती. याकडे लक्ष वेधत हा एक सुनियोजित कट असल्याचा दावा कोटपल्ली यांनी केला आहे.
दरम्यान, हे नक्षल भाभी प्रकरण समोर आल्यानंतर आता पत्रकारही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कथित भाभीची पत्रकारांनी मुलाखत घेतली होती. एका ठिकाणी तर एक महिला पत्रकार या नक्षल भाभीचा पदर नीट करताना दिसते आहे. आणखी एका व्हिडिओत तीच महिला जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या गाडीमागे धावताना दिसते आहे. या सगळ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू असून आता कारस्थानाच्या थिअरीवर शिक्कामोर्तब करण्याचे प्रयत्नही होताना दिसत आहेत.