मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात एक बॉम्ब टाकला तो म्हणजे पेन ड्राईव्ह बॉम्ब. त्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आता नवा खुलासा केला आहे. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्रँग असल्याचं पाटील म्हणाले आहेत.
“केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो असं सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्रँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजपा तसेच जनता आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच पुढे बोलताना फडणवीस यांना मुंबईतील वांद्र-कुर्ला पोलिसांनी बजावलेली नोटीस तसेच त्यांची होत असलेली चौकशी यावरही पाटील यांनी भाष्य केलंय. “देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना माहितीचा सोअर्स कोठून मिळाला हे विचारता येत नाही. मात्र त्यांना ही माहिती कोठून मिळाली हे विचारण्यासाठी चौकशीला बोलवलं आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली. घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याच्या प्रमाणे दर्जा आहे. त्यामुळे त्याला माहिती कोठून मिळाली हे विचारायचं नसतं. मात्र अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सुरु आहे,” अशी टीका चंद्रकांत पटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.