जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२.३० ही वेळ असलेल्या या ‘अनुभूती बालनिकेतन’मध्ये यात ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता अनुभवतातून आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. यासाठी कॅनेडा येथून भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी गायत्री बजाज अनुभूती स्कूलमध्ये कार्यरत झाल्या आहेत.
‘अनुभूती बालनिकेतन’ येथे शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते स्वीकारतील अशी ही शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण मिळेल. स्वत:च्या बुद्धीमत्तेचा विकास स्वयंनिरीक्षणातून कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिक शिक्षण यातून मिळेल. पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध आहेत.
यामध्ये खेळता-खेळता टेबल लर्न करणे, वाचता-वाचता Vocabulary (शब्दसंग्रह) वाढविणे, शब्दांची आणि वाक्यांची रचना करणे, जगाच्या नकाशातून भुगोल शिकणे, पेन-पेन्सील व कागदाचा अचूक वापर करून अक्षरांची ओळख करणे, गणितांचे कोडे सोडणे, जड फर्निचरच्या जागी, मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे अश्या अनेक गोष्टी येथे आहेत. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, स्वयंपाक करताना भाजीपाला निवडणे, धान्य निवडणे, बटन लावणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींचा समावेश अनुभूती बालनिकेतनमधील शिक्षणामध्ये केला आहे. याठिकाणी तज्ज्ञ गाईड जे मुलांमध्ये प्रश्न निर्माण करण्याची, स्वतंत्र विचार व्यक्त करण्याची मानसिकता तयार करतील. शिवाय सकारात्मक विचार कसा करावा याचे लहानपणीच ज्ञान मिळेल.
मॉन्टेसरी ही फिलासॉपी समजण्यासाठी नुकतेच पाच दिवशीय वर्कशॉप झाले; यामध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘अनुभूती बालनिकेतन’ हे मॉन्टेसरी प्री स्कूल सुरू केले असून ४० मुलांनाच या बालनिकेतनमध्ये प्रवेश दिला जाईल. सकाळी ९ ते १२.३० असा वेळ या स्कूलचा असेल.
‘अनुभूती बालनिकेतन ही डॉ मर्या मॉन्टेसरी गुरूकूल पद्धतीची कान्हदेशातील प्रथमच स्कूल होईल. आणि यातूनच सक्षम-चारित्र्यवान पिढी घडेल आणि भवरलालजी जैन यांच्या व विचारातील सज्जन समाजनिर्मितीचा संकल्प पुर्ण होईल.”
– सौ. निशा जैन, संचालिका, अनुभूती स्कूल