जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या दि. २९ एप्रिल, २०२१ च्या आदेशान्वये फक्त अत्यावश्यक सेवेकरीता ऑटोरिक्षामधून कमाल २ प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी पध्दतीने आळा घालण्याकरीता या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व ऑटोरिक्षा चालकांची तसेच प्रवाशांची सुध्दा आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार पूर्णपणे रोखणे अत्यावश्यक आहे. याकरीता जिल्हा प्रशासन यांचेकडून विविध मोहिमा व बंधने घालण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व ऑटोरिक्षा चालकांनी ऑटोरिक्षांमधील प्रवासी व चालक यांच्यात संपर्क होवू नये, याकरीता त्यांचे ऑटोरिक्षांमध्ये चालक केबीन व प्रवाशांना बसण्याची जागा या दरम्यान फायबर/प्लास्टीकचे अथवा इतर पारदर्शक पडद्याने विभाजन करावे जेणेकरुन होणारा संसर्ग टाळता येईल.
जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी याप्रमाणे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये सुधारणा करुनच प्रवासी वाहतूक करावी. जे ऑटोरिक्षाधारक या सुचनांचे पालन करणार नाहीत, अशा ऑटोरिक्षाचालकांविरुध्द दि. १६ मे, २०२१ पासून मोटार वाहन कायदा १९८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ व भारतीय दंड संहिता अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व ऑटोरिक्षाचालकांनी नोंद घ्यावी. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
















