जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले आहे. तरी पडताळणीत त्रुटी आढळलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्रुटीची पूर्तता तातडीने पूर्ण करावी. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. समितीकडे माहे डिसेंबर २०२० या महिन्यामध्ये ४५१० इतकी मोठया प्रमाणात प्रकरणे प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने समिती अशा विद्यार्थ्यांचे जातीदावा प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे कामकाज करीत आहे. समितीने दिनांक ११ ते २२ जानेवारी, २०२१ या कालावधीत दिवसरात्र उशीरापर्यंत, शासकीय सुट्टीच्या दिवशीही नियमित समिती कार्यालय चालू ठेवून कामकाज केले असून सुमारे ९५० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांच्या ई-मेल वर पाठविण्याची कार्यवाही केली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटीत आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्रुटी पुर्तता केल्यावर त्यांचाही निपटारा त्वरीत करण्याचे काम समितीस्तरावर होत आहे. तरी पडताळणीत त्रुटी आढळलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्रुटीची पूर्तता तातडीने पूर्ण करावी. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.















