जळगाव (प्रतिनिधी) दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी. याकरीता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली असून या योजनेचा लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या महामंडळास चालु आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरीता 300 लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट व 5 लाभार्थींना बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते.
महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास आवश्यक बाबी-
अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे, केंद्रिय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3 लाखापेक्षा कमी असावे, राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण/ शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे, अर्जदाराने महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा, कुटूंबातील पती वा पत्नी या दोघांपैकी एकालाच महामंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल, महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहातील,
अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे
अर्जाचा नमुना/फॉर्म कार्यालयात मोफत/विनामुल्य उपलब्ध आहे, अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा), नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्डाच्या झेरॉक्सप्रती/आधारकार्ड झेरॉक्स प्रती, मोबाईल नंबर, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा उपलब्धतेबाबतचा पुरावा, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, वाहन व्यवसायकरीता ड्रायव्हींग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवाशी वाहतुक परवाना इत्यादी, वाहन व्यवसायाबाबत वाहनाच्या बुकींगबद्दल/किंमतीबाबत अधिकृत विक्रेता कंपनीकडील दरपत्रक, व्यवसायसंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, व्यवसायासंबधी प्रकल्प अहवाल/खरेदी करावयाच्या मालाचे, कोटेशन, प्रतिज्ञापत्र (स्टॅम्पपेपरवर), विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपुर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात दाखल करावा.
महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजना
महामंडळाच्या अनुदान/बीजभांडवल योजना राबविण्यात येत असतांना कार्यालयात लाभार्थीकडुन प्राप्त झालेल्या विविध योजनांची सर्व कर्जप्रकरणे गठीत केलेल्या लाभार्थी निवड समितीसमोर ठेवण्यात येतात. सदर लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी असतात, समितीने मंजुर केलेले प्रस्ताव कर्ज मंजुरीसाठी महामंडळामार्फत राष्ट्रीयकृत बँकेकडे शिफारस केले जातात. अनुदान योजना- प्रकल्प मर्यादा रु.50 हजारपर्यत गुंतवणूक असलेल्या कर्जप्रकरणांत महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्पखर्चाच्या 50% किंवा रु. 10 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल, बॅककर्ज अनुदान वगळुन बाकीचे सर्व रक्कम बॅकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज अकारणी होते.
बीजभांडवल योजना- प्रकल्प मर्यादा रु 50 हजार ते 7 लाखापर्यंत, बँककर्ज रु 50 हजार ते 7 लाखापर्यंतच्या मंजुर कर्जप्रकरणांमध्ये रु. 10 हजार अनुदान वगळता उर्वरीत कर्ज राशीमध्ये पुढीलप्रमाणे कर्जाची विभागणी असेल, 5% अर्जदाराचा सहभाग, 20% महामंडळाचे कर्ज (रु. 10,000 अनुदानासह) 75% बँकेचे कर्ज, परतफेड-बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाचे कर्ज द.सा.द.शे. 4% व्याजासह महामंडळाकडे परतफेड करावयाचे आहे. अशाप्रमाणे महामंडळाच्या योजना राबविण्यात येत आहेत. तरी संबधीत होतकरु समाजातील महिला/पुरुष वर्गानी याचा फायदा घ्यावा. असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगावचे व्यवस्थापक ताराचंद्र कसबे यांनी केले आहे.