मुंबई (वृत्तसंस्था) मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल इथं वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर याप्रकरणात वनविभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पण आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलंय. तसेच याप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वरील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्वीटरवर टाकलं आहे. यावेळी फडणवीसांनी RFO दीपाली चव्हाण प्रकरणात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वरील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.
‘खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?’, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.
‘अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते’, अशी खंतही फडणवीसांनी ट्वीटरवरुन व्यक्त केली आहे.
RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांच्यानंतर आता मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याची चर्चा केली. त्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती.