चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या ‘पंचायत’ या भन्नाट वेब सिरीजचा तिसरा सिझन आलाय. या वेब सिरीज मधील देख रहे हो ना बिनोद….! हा संवाद प्रचंड लोकप्रिय झाला असून त्याचे विविध मिम सोशल मिडियाच्या दुनियेत ठीकठिकाणी तरंगताना आपल्याला नेहमीच दिसून येतात. या वेब सिरीजमधील ‘बनराकस’ आणि ‘बिनोद’ दोन पात्र नेहमी गावातील प्रधान पती आणि सचिवजी विरुद्ध कट कारस्थान रचत असतात. त्यातून गावात गंमतीजंमती होतात. सांगायचा उद्देश एवढाच की, चाळीसगावातही सध्या अशीच एक गंमत सुरु आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या गावात मताधिक्क्य कुणाला? स्मिताताई वाघ की करण पवार ?. अर्थात आमदार चव्हाण समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या अधिकृत आकडेवारीचे तक्ते माध्यमांना पुरावे म्हणून पाठवल्यामुळे ही गंमत अधिकची रंजक झाली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदार संघात १६ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मात्र, चर्चा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे सिम गावात मताधिक्य नसल्याच्या दाव्या आणि प्रतीदाव्यावर होत आहे. काही ठिकाणी मताधिक्क्य नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर आज भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारीच सादर करून मताधिक्क्य नसल्याचा दावा आपण खोडून काढल्याचे म्हटले आहे.
प्रा.सुनील निकम यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सदर बातम्या ह्या खोट्या आकडेवारीवर आधारित व दिशाभूल करणाऱ्या आहेत. जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या गावनिहाय असलेले बुथ क्रमांक व बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारी वरून आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे या दोन्ही गावातील तिन्ही बूथवर भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना 573 मतांचे मताधिक्य तर दुसऱ्याच गावाच्या बूथ केंद्राची माहिती हे आमदारांच्या गावाची असल्याचा भासविण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्रांनी केला आहे. तसेच खोट्या आकडेवारीवर आधारित बातम्या प्रकाशित केल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत जाहीर खुलासा करावा, अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी केली आहे. दरम्यान, अनधिकृत आकडेवारीच्या पीडीएफ फाईलमध्ये बूथ क्रमांकाचा घोळ झाल्यामुळे बातम्या चुकल्या असून जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या अधिकृत पीडीएफ फाईलमध्ये आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या गावात स्मिता वाघ यांना लीड असल्याचेही श्री. निकम यांनी म्हटले आहे.
सुनील निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे हिंगोणे खुर्द व हिंगोणेसिम गावातील मतांची बुथनिहाय दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणे !
हिंगोणे खुर्द
- बूथ क्र.133 – स्मिता वाघ – 218 करण पवार – 114
- (स्मिता वाघ मताधिक्य – 104)
बूथ क्र.१३४ – स्मिता वाघ – 285 करण पवार – 119
- (स्मिता वाघ मताधिक्य – 166)
हिंगोणे सिम –
- बूथ क्रमांक 135
- स्मिता वाघ – 474 करण पवार – 171
- (स्मिता वाघ मताधिक्य – 303)
एकूण मताधिक्य – 573
















