कजगाव ता. भडगाव (प्रतिनिधी) येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने-चांदीसह रोकड, असा अंदाजे दहा लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला. चव्हाण व देशमुख कुटूंबास दरोडेखोरांनी मारहाण करत चार ते पाच जणांना जखमी केले. एवढेच नव्हे, दीड वर्षाच्या बालकाच्या गळ्यास तलवार लावत चव्हाण यांच्याकडील ऐवज लांबवला.
कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडत दरोडेखोरांनी आत करत कपाटात ठेवेलेले आणि अंगावरील दागिने शस्त्राचा धाक दाखवत लुटले. देशमुख यांच्या घरातून साडेसात तोळे सोने व एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेत तेथून काही अंतरावर असलेल्या बापू खोमणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू असतांनाच बापू खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आल्याने ते जागे झाल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. तेथून काही अंतरावर असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे दरोडेखोरांनी आपला मोर्चा वळविला. या ठीकाणी बाहेरच झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला.
एका रूममध्ये ताराबाई ओंकार चव्हाण झोपलेल्या असतांना दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवार रोखत अंगावरील एक किलो वजनाचे चांदीचे कडे (गोट) व अंगावरील सोन्याची पोत कानातले असे अडीच तोळे सोने तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोने सह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी ओढून घेतल्याने त्यांच्या कानाला जबर दुखापत झाली. तर समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला.
सोन-चांदी देण्यास नकार दिल्याने दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण (वय ६८) यांना दोघ पायावर मारहाण केली. तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हातावर मोठी दुखापत करत समाधान चव्हाण यास देखील जबर मारहाण दरोडेखोरांनी केली. सदर घटनेबाबत गावात फोन केल्यानंतर काही तरुण काही मिनिटांतच घटनास्थळी पोहचले मात्र, दरोडेखोरांनी तेथून पळ काढला घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, फौजदार डोमाळे पालकर, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुतेसह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. या घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. श्वानाने देशमुख यांचे घरापासून तर थेट चव्हाण यांच्या घरापर्यंत माग दाखविला पुढे चव्हाण यांचे घरापासून बाजूलाच असलेल्या शेतापर्यंत माग दाखविला व तेथेच तो घुटमळला.