भुसावळ (प्रतिनिधी) ”तुमच्या मुलीचा विवाह माझ्याशी करा अन्यथा सर्वांना गोळ्या घालेल” अशी धमकी शहरातील कुख्यात गुंड आशिक अस्लम बेग उर्फ बाबा काल्या याने एका कुटुंबाला दिली. भयग्रस्त कुटुंबाने पोलिसात धाव घेतल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, संबंधित कुटुंबातील १९ वर्षीय युवतीचा २ एप्रिल २०२० रोजी विवाह निश्चित झाला होता. मात्र, जळगाव येथील वर मुलास संशयित बाबा काल्याने युवतीशी विवाह केल्यास ठार मारेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे हा विवाह तुटला. यानंतर या तरुणीचा आपल्यासोबत विवाह करावा यासाठी त्याने कुटुंबाला धमकावले. एवढेच नव्हे तर माझ्यासोबत लग्न लावून न दिल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांना गोळ्या मारेल, अशी धमकी देत पिस्तुलाच्या धाकावर घरावर दगळफेक केली. यामुळे हे कुटुंब प्रचंड भयग्रस्त झाले. यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात याप्रकरणी फिर्याद दिली. यानुसार आशिक अस्लम बेग उर्फ बाबा काल्या (रा. अयान कॉलनी, भुसावळ) आणि २० वर्षीय अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा काल्याला आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे काळातच त्याने आपल्या साथीदारासह पळ काढला. दरम्यान, आशिक अस्लम बेग उर्फ बाबा काल्या हा हिस्ट्रीशीटर गुन्हेगार असून त्याच्यावर लूट, धमकावणे आदींसह अनेक गुन्हे दाखल आहेत.