मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महिलांचा अपमान होत असेल तर आम्ही आमदारांना चोपू असे वक्तव्य केले. रोहिणी खडसे-खेवलकर यांना अटक करा, यासाठी शिवसेना (ShivSena) आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर शहरात ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
काल रोहिणी खडसे यांनी महिलांचा अपमान होत असेल तर आम्ही आमदारांना चोपू असे वक्तव्य केले. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला. यावर एकनाथराव खडसे यांनी या सर्व चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी आपल्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांचा संदर्भ असणाऱ्या ऑडिओ क्लीप्स असल्याचा देखील दावा केला. यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या ऑडिओ क्लीप्स वाजवून दाखविण्याचे प्रतिआव्हान दिले. यात आपल्याबाबत काही असेल तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असेही त्यांनी नमूद केले. तर रात्री उशीरा एकनाथराव खडसे यांनी या ऑडिओ क्लीप्समध्ये आमदारांचाच संदर्भ असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
दरम्यान, यानंतर आज शिवसेनेतर्फे रोहिणी खडसे यांना अटक करावी या मागणीसाठी तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलीस स्थानक परिसरात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदा घोषणाबाजी करून आंदोलन केले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी रोहिणी खडसे यांना अटक करण्यात यावी. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल असा इशारा यात देण्यात आला आहे. यामुळे आता हे प्रकरण चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.