मुंबई (वृत्तसंस्था) आयएनएस विक्रांतच्या म्युझियमसाठी मोहीम राबवून गोळा केलेल्या पैशांचे काय केले, अशी विचारणा प्रसारमाध्यमांनी करताच भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेऊन थेट गाडीत जाऊन बसले. तर दुसरीकडे ७११ बॉक्समधून सोमय्यांनी पैसे गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे व्हाइट केले, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान, मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयएनएस विक्रांत प्रकरणात ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्याविरोधात मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात कलम ४२०, कलम ४०६ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याच तक्रारीच्या आधारावर सोमय्यांवर ५८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करून पिता-पुत्र तुरुंगात जाणार, असा इशारा दिला आहे. ७११ बॉक्समधून सोमय्यांनी पैसे गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे व्हाइट केले, असा राऊतांचा दावा आहे.
तो प्रश्न विचारताच सोमय्यांचा काढता पाय
गुरुवारी सोमय्या यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना प्रकरणात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांची भेट घेतली. जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा कारखान्याचे सभासद असलेल्या २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यास ईडीची हरकत नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला असून त्यामुळेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तत्पूर्वी, राऊत यांच्या आरोपांबाबत विचारणा केली असता, “आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत. माझ्याविरोधात तक्रार केली म्हणून सांगितले जात आहे; पण तक्रारीची प्रत त्यांनी दाखवावी. ठाकरे सरकारमधील घोटाळे बाहेर काढत असल्याने ते असे बोलत आहेत. संजय राऊत यांनी विक्रांतप्रकरणी घोटाळा झाल्याने दाखवावे,’ असे आव्हानही सोमय्या यांनी दिले. या वेळी प्रसारमाध्यमांनी आयएनएस विक्रांतचा विषय छेडताच काढता पाय घेऊन सोमय्या गाडीत बसले.
म्युझियमसाठी गोळा केले पैसे, मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिसात गुन्हा
सन २०१४-१५ मध्ये सरकारने आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढली. मात्र त्यावर म्युझियम करावे, अशी मागणी झाली. त्यासाठी २०० कोटींची गरज होती. त्याच वेळी सोमय्यांनी मोहीम सुरू करून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती, परंतु हे पैसे राजभवनाला मिळाले नाहीत, असे राजभवनाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.