वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. तर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाला असून ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. परंतु, अमेरिका निवडणुकीत झालेला आपला पराभव मान्य करायला डोनाल्ड ट्रम्प काही तयार नाहीत. त्यामुळे त्यांना जवळच्या व्यक्तींकडून सल्ला देण्यात येत आहे.
अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. परंतु, आता निकाल जाहीर झाल्यानंतरही ते आपला पराभव मान्य करायला तयार नाहीत. तसेच ते सतत जो बायडन यांच्याविरोधात अनेक वक्तव्य करत आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जोरेड कूश्नर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी आपले सासरे डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला देत, आपला पराभव स्विकारण्यास सांगितले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जोरेड कूश्नर आपले सासरे डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणाले की, ‘त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडन यांच्याकडून झालेला पराभव आता मान्य करावा.’ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसं जो बायडन हे निवडणूक जिंकून अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘मी तोपर्यंत आराम करणार नाही, जोपर्यंत अमेरिकी लोकांकडील ईमानदार मतांची मोजणी होत नाही आणि ही लोकतंत्राची मागणी आहे.’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच वक्तव्यानंतर त्यांचे जावई कूश्नर यांनी आपल्या सासरेबुवांना सल्ला दिला होता. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. असे असताना ही निवडणूक जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत आपण जिंकल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ट्रम्प म्हणाले, “I WON THIS ELECTION, BY A LOT!”. या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.