पुणे (वृत्तसंस्था) एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केलं आहे.
काल एमपीएससीची राज्यसेवा पूर्ण परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यभर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यींनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. पुण्यातील आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन नवीन तारीख जाहीर करण्यार असल्याचे सांगितले आणि त्यानुसार, येत्या २१ तारखेला परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि केंद्राच्या पथकातील सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाउन आणि एमपीएससीच्या गोंधळाबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, ‘एमपीएससी प्रकरणी राजकारण करणे योग्य नाही. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि तोडगा काढला.’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती. सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचं काम विरोधकांनी केलं असून ते चुकीचं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातलं आणि एमपीएससीला सूचना केल्या. त्यानुसार आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढलं आहे. “एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होतं. त्यामध्ये एमपीएससी कुठंतरी कमी पडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैवआहे. कोणतंही कारण नसताना विरोधक रस्त्यावर उतरले, या प्रकरणात विरोधकांनीही राजकारण केलं तेही दुर्दैव आहे.”