रावेर (प्रतिनिधी) शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकांवर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पाल भागात कंपार्टमेंटमध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मांजल येथील गुराखी दिपला बारेला आपल्या मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे बुधवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं. नं. ६१ मध्ये गेला असतांना याठिकाणी दबा धरून बसलेल्या हिंस्र प्राण्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व त्यानंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले. याबाबत सोबतच्या गुराख्यानी गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेलल्या घटनेबाबत सांगितले. गावकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून हिंस्र प्राणी पसार झाला होता. यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपला बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.
बापाने बुटमध्ये आणून पाणी पाजले
दिपला बारेला याच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून जखमी केले होते. यावेळी त्याला पाणी पाजण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने वडील माल्या बारेला याने स्वतःच्या बुटात नाल्यातून पाणी आणून पाजले व जखमी अवस्थेत दुचाकीवर १२ किलोमोटर पाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना – वैदकीय अधिकारी सचिन पाटील
दिपला बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर हिंस्र प्राण्याची नखे लागली असून डोक्याची कवटी फुटलेली असल्याने सिटी स्कॅन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करू – वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण
जखमी मुलाला पुढील उपचारसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून वन विभागातर्फे पाठपुरावा करून शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन वन्यजीव वनविभाग पालचे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी दिले.
















