जळगाव (प्रतिनिधी) दहा हजार हप्ता दिला नाही म्हणून पाळधी येथील हॉटेल साईनाथ ढाबाचे मालक किरण नन्नवरे यांच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे. त्यात नन्नवरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिविल हॉस्पिटल (देवकर रुग्णालय) येथे उपचारासाठी सुरु आहेत.
गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास बांभोरी येथील राहुल राजु सपकाळे व त्यांच्यासोबतच्या दोन जणांनी साईनाथ ढाबा येथील घेऊन हॉटेल मालक किरण त्र्यंबक नन्नवरे यांना दर महिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी मागूनही तू का देत नाही?, अशी विचारणा करून जेवणाचे बिल न देता मारहाण सुरू केली. काही वेळाने सपकाळे यांनी फोनवरून गावातील सात ते आठ जणांना बोलवून घेतले. या सर्वांनी मिळून नन्नवरे यांच्यावर जबर हल्ला करून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. यावेळी हल्लेखोरांनी खुर्च्यांची फेकाफेक करून हॉटेलचे नासधुस केली आहे. हल्लेखोरांनी हॉटेलच्या काउंटर मधून दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली आहे. हा सर्व प्रकार हॉटेल मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून यावेळी हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराने हायवेवरील हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
















