पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील टोळी येथील दलित विद्यार्थिनीवर सामुहिक अत्याचार करून तिला विष पाजण्यात आले होते. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या पीडित कुटुंबीयांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी टोळी येथे आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे,नगरसेवक पप्पु भावे यांच्यासह भेट घेतली. यावेळी ना. पाटील यांनी पीडित कुटुंबाला ८ लाख २५ हजार रुपये मदतीची घोषणा केली.
पारोळा येथील मामाकडे आलेल्या टोळी येथील रहिवासी २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या तरुणीचा उपचार सुरू असताना धुळे येथे मृत्यू झाला होता. गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे आदींनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पीडितेच्या आईने खटला जलदगतीने चालवून अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. शासन आपल्या पाठीशी आहे. न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी प्रांतधिकारी विनय गोसावी,डॉ.दिनकर पाटील, प्रेमानंद पाटील, मधुकर पाटील, चतुर पाटील, तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, दादाभाऊ पाटील, डॉ. पी. के. पाटील, भूषण भोई, पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, सहायक गटविकास अधिकारी आहिरे,अशोक मराठे, भाऊसाहेब पाटील, धरणगावचे नगरसेवक पप्पु भावे हे उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक योगेश पाटील यांच्याशी चर्चा करून पीडित कुटुंबाला सव्वा आठ लाख मदत घोषित केली. ही मदत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधीनियम समिती शिफारसीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली. एफआयआर व पीएम रिपोर्ट व इतर कागदपत्रे पोलीस विभागाकडून मिळाल्यानंतर प्रथम एकूण अर्थसहाय रक्कमेच्या ५० टक्के ४,१२,५०० रुपये मंजूर होतील. चार्जशीट दाखल झाल्यावर एकूण अर्थसहाय रक्कमेच्या २५ टक्के २,०६,२५० रुपये मंजूर होतील व अंतिम निकाल लागल्यानंतर एकूण अर्थसहाय रक्कमेच्या २५ टक्के २,०६,२५० रुपये मिळतील.