भुसावळ ( प्रतिनिधी )- गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन २०२६ अंतर्गत गझलकट्ट्यात प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझल सादरीकरणाने साहित्यप्रेमी रसिकांवर गारूड केले. दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या या संमेलनात त्यांच्या गझलेची निवड होणे हीच त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेची पोचपावती ठरली.
न्हावी येथील फेगडे गुरूजी यांची नात व भुसावळ येथील गोपाल प्रेमचंद पाटील(हनुमान नगर) यांची सून असलेल्या प्राजक्ता पाटील या नव्या पिढीतील संवेदनशील, अभ्यासू व प्रभावी गझलकारा म्हणून ओळख निर्माण करीत असून, त्यांच्या लेखनात स्त्रीमनाचे सूक्ष्म भाव, निसर्गाशी नातं आणि पारंपरिक गझल शास्त्र यांचा सुरेख संगम दिसून येतो.
“बाईवरती ज्यांची असते नजर नेहमी त्यांची
हयात सारी उलटून जाते प्रेम समजण्यासाठी”
“सांग निसर्गापासुन कुठवर जपशिल वेली?
कळी उमलण्याचा उत्कट क्षण येणारच ना”
या शेरातून त्यांनी स्त्रीच्या सहनशीलतेसोबतच आत्मविश्वास आणि स्व-अभिव्यक्तीचा उत्कट क्षण प्रभावीपणे मांडला.
तसेच,
“केवळ प्राजू नाही मी तर तुझी सावली
कृष्णासोबत.. राधा गौळण येणारच ना”
या शेरातून प्रेम, समर्पण आणि स्त्रीअस्मितेचा भाव रसिकांच्या मनाला भिडला.
त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास, शब्दोच्चारातील सहजता आणि भावनांची प्रामाणिक मांडणी यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट, शाबासकीच्या प्रतिक्रिया आणि मान्यवर साहित्यिकांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
प्राजक्ता पाटील यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, ग्रामीण व निमशहरी भागातील होतकरू मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून, साहित्य क्षेत्रात स्त्रीप्रतिभेला मिळणाऱ्या संधींचे आशादायक चित्र उभे करत आहे.
















