पुणे(वृत्तसंस्था ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदित्य ठाकरे हे दि २ रोजी पुण्यात आमने-सामने आल्याने आता काय होणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. दिवसभरात कुठलीही घटना घडली नाही परंतु आदित्य ठाकरे यांची रात्री कात्रज येथे शिव सवांद यात्रा आटोपल्यानंतर माजी मंत्री उदय सामंत यांचा वाय दर्जाच्या सुरक्षेत ते याठिकाणाहून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली होती.
या हल्ल्यामागे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलिसांनी हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये शिवसैनिकांची (Shivsena) धरपकड सुरू केली आहे.
उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन हल्लेखोरांविरोधात तक्रार नोंदवली होती. यावेळी त्यांनी पोलिसांना हल्लेखोरांचे काही फोटोही दिले. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी काल रात्रीच कारवाई सुरु केली. ‘शिवसंवाद’ सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे आणि रुपेश पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. सोबतच १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर शोधमोहिम राबवून पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई केली. काल रात्रभरात पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. पोलिसांनी या शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनाही अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांना बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडण्यासाठी प्रोत्साहन देणारे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांनाही पोलिसांनी बुधवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. त्यांनादेखील अटक होण्याची शक्यता आहे.
या सगळ्या प्रकारानंतर आता पुण्यातील शिवसैनिकही आक्रमक होताना दिसत आहेत. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिकांकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुण्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तसेच या सगळ्या कारवाईचे धागेदोरे आता आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणार, हेदेखील पाहावे लागेल.