भुसावळ प्रतिनिधी । शहरा लगत असलेल्या कंडारी गावातील २० वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत अनिल कांबळे (वय-२० रा. कंडारी येथील सम्राट कॉलनी) येथे राहत असून (दि. २३) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तापी नदी पात्रा नजीकच्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. संकेत हा फोनवर बोलत बोलत विहिरीकडे आला व अचानक त्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
यावेळी परिसरातील मुलांनी ही घटना नागरिकांना कळविली. यानंतर त्याला तब्बल तासाभराच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पो.नि. बाबासाहेब ठोंबे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामिण रुग्णालयात रवाना करण्यात आले असून याबाबत रात्री उशीरापर्यंत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत होती. त्याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.