मुंबई (वृत्तसंस्था) काल रात्री दोन शिवसैनिकांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भायखळ्यामधील शिवसेना शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला, त्यांना आधार दिला. तसेच शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी खपवून घेणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करत त्यांनाही चांगलच झापलं.
शुक्रवारी शिवसेना भवनावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावर असलेल्या 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी गुरुवारी रात्री हल्ला केला होता. शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचं मी आव्हान करतोय. मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झालीच पाहिजे. असं राजकारण कधी झालं नव्हतं. तुम्ही राजकारणात पडू नका”, असंही ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं.
शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी खपवून घेणार नाही. पोलिसांनी राजकारणात पडू नये. आमच्या राजकारणात तुम्ही लक्ष घालू नका. आम्ही लढू, पण माझ्या सैनिकांच्या जीवावर बेतत असेल तर शांत बसणार नाही. काही झालं तर या सगळ्याला तुम्ही जबाबदार असाल, असं उद्धव ठाकरे पोलिसांना उद्देशून म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. आपल्याकडे कर्तेकरविते उपमुख्यमंत्री आहेत. आपल्यावरील अन्याय त्यांना जाऊन सांगूया. त्यांनीही जर सांगितलं की आम्हाला संरक्षण करणं जमत नाही तर मग आपलं संरक्षण करण्याला आपण शिवसैनिक समर्थ आहोत, असंही उद्धव म्हणाले. तसेच शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागता कामा नये. पोलिसांनी राजकारणात पडू नये. शिवसैनिकांच्या जिवावर येणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. दरम्यान या सर्व प्रकाराची पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.