अमळनेर(प्रतिनिधी) : जमिनीच्या वाटणीवरून बहीण व मेहुण्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शालक बाळकृष्ण रामभाऊ पाटील बाळकृष्ण पाटील (रा. बात्सर, ता. भडगाव, ह. मु. पुणे) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये ही घटना घडली होती. अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी बुधवारी हा निकाल दिला.
बहीण शांताबाई व मेहुणे चैत्राम पाटील (रा. जोगलखेडा, ता. पारोळा) यांनी वाटणीतील जमिनीवरील हक्क सोडून द्यावा व दिवाणी खटला मागे घ्यावा. यासाठी वादातन 3 ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी बाळकृष्ण याने जोगलखेडा येथे चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात दोघे जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जोगलखेडा फाट्यावर बाळकृष्णला एका व्यक्तीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपीस जन्मठेप, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास तसेच कलम ४५२ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास तसेच दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलीस निरीक्षक जी. के. आघाडे, उपनिरीक्षक आर. जी. दहीहंडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. कामकाज पारोळा पोलीस स्थानकाचे अनिल मोरे, पैरवी अधिकारी हिरालाल पाटील यांनी पाहिले..