पारोळा (प्रतिनिधी) शाळा शिकायची जिद्द असतानाही, दोन टवाळखोर त्रास देत असल्याने एका अल्पवयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरसमणी येथील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील एक १५ वर्षीय अल्पवयीन युवती पारोळा येथे शिक्षणासाठी रोज पारोळा ते शिरसमणी ये-जा करते. सध्या बसेस बंद असल्याने खासगी वाहनातून ती रोज ये-जा करत होती. यावेळी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गावातील दोन तरुण समाधान मांगू पाटील, भावेश गोटू वंजारी (शिरसमणी, ता. पारोळा) हे दोन तरुण नेहमी ती ज्या वाहनाने जात असे. त्या वाहनाचा पाठलाग करत होते, असे या युवतीने म्हटले आहे. एके दिवशी समाधान मांगू पाटील याने तुझ्याशी लग्न करायचं आहे, असे सांगितले. त्यास नकार दिला असता, त्याने चाकूचा धाक दाखविला व पारोळा तहसील कार्यालयाच्या परिसरात नेऊन फोटो काढले. हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर, आईने वडिलांची तब्येत बरी नसल्याने, तू तुझे शिक्षण बंद कर, असे सांगितले.
शाळा शिकण्याची जिद्द असताना, आता शाळा सोडावी लागणार, या निराशेतून दि. १० रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या युवतीने शेतात असलेले विष सेवन करून घेतले. यावेळी उलट्या होऊ लागल्याने, आई-वडिलांनी तिला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत मंगळवारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी या दोन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.