जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र-५२ (जुना २११) या महामार्गावर औट्रम घाटातील साखळी क्र. ३७६+००० ते ३९०+००० मधील रस्ता ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता. तसेच घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजुस दरी व दुसऱ्या बाजुस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलेला होता व वाहतुक वळविण्यात आलेली होती.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व पाहणी करुन सद्य:स्थितीत औरंगाबाद ते धुळे वाहतुक करणाऱ्या दुचाकी व हलक्या/छोट्या वाहनांसाठी १५ सप्टेंबर, २०२१ पासुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्या घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असुन अवजड वाहनांसाठी रस्ता सुरु करणे सुरक्षित नाही. त्यामुळे औरंगाबाद-धुळे वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी खालील मार्गाने वाहतुक वळविण्यात आलेली आहे.
सर्व प्रकारच्या अवजड वाहनासाठी औरंगाबादकडून धुळेकडे येणारी व जाणारी जड वाहतुक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांव-मालेगाव मार्गे धुळ्याकडे व औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतुक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांवमार्गे चाळीसगावकडे अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. असे महाव्यवस्थापक (तांत्रीक) तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.