हिंगोली (वृत्तसंस्था) हिंगोलीत पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आलेल्या दप्तर तपासणीच्या वेळी गैरहजर राहून गुन्हे निकाली काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. ६ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दप्तर तपासणीसाठी बोलावले होते. दरम्यान, या तपासणीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना देऊनही हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे जमादार सखाराम जाधव हे गैरहजर राहिले. तसेच जमादार कामाजी झळके यांच्याकडे ता. ९ जुलै २०१८ ता. १४ जून २०२० या कालावधीत गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांना उपस्थित राहण्याबाबत कळविल्यानंतरही ते आजारी रजेचे कारण सांगून हजर राहिले नाहीत.
दरम्यान, फिर्यादीला न्याय देण्याचे हेतूपुरस्सर त्यांनी टाळले असून तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आरोपींना सहकार्य ठेवण्यासाठी तपास सहकार्य ठेवण्यासाठी पोलिसांनी तपासकामात दिरंगाई केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात, हे पोलिस अधीक्षकांनी या कारवाईने दाखवून दिले आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक सोनाजी सूर्यभान आम्ले यांच्या तक्रारीवरून साहेबराव जाधव यांच्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तर अशाच प्रकरणात आम्ले यांच्या तक्रारीवरून पोलिस मुख्यालयातील कामाजी तुकाजी झळके या हवालदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.