धरणगाव (प्रा. बी.एन.चौधरी) धरणगावच्या साहित्य, कला, संस्कृती आणि वैभवाच्या समृध्द वारश्यात ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यात येथील शिवकालीन भवानीमातेच्या मंदिराचा समावेश होतो. या मंदिरातील मातेची मूर्ती, ही स्वयंभू असून तिला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्राचे भुषण, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, १६७२ साली धरणगावला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी येथील श्री सारजेश्वर आणि आई भवनीमातेच्या मंदिराला भेट दिल्याची नोंद आहे. धरणगावकरांच्या आस्थेचे आणि श्रध्देचे स्थान असणाऱ्या, भवानीमाता मंदिर परिसराला नवरात्रीत यात्रेचे स्वरूप येते. येथे श्रध्देने, नियमित येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना आई भवानी हमखास पूर्ण करते, असा भाविकांचा विश्वास आहे.
आई भवानीची, सर्वत्र किर्ती,
मंदिरात शोभे, तेजःपुंज मूर्ती :
शहरापासून दूर, पश्चिमेला, पारोळा रोडकडे जातांना भाटीयांची शेती लागते. साधा बैलगाडीचा रस्ता.मात्र, हिरवाईने नटलेला. जणू निसर्गाने रस्त्यांवर कमानच उभारली आहे,वृक्ष वेलींची. त्या खालून चालतांना अंगावर रोमांच उठतात. मधेच एखादा पक्षी आपल्या जवळून झेपावतो.कधी एखादं नाजूक फुलपाखरु आपल्या अंगावर येवून बसतं. असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परीसर.त्यातील सतिष आसर यांच्या शेतात हे मंदिर आहे. भव्य नसलं तरी, शेत शिवारात उभं असलेलं मातेचं मंदिर आणि मंदिरासमोर उभी असलेली टोलेजंग दिपमाळ तिच्या पुराणत्वाची ग्वाही देणारी आहे. मंदिरातील मूर्ती अतिशय तेजःपुंज असून, नवरात्रीत ती अधिकच दैदीप्यमान दिसते. येथील अनेक भाविक परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे, देवीची किर्ती परीसरातच नव्हे, तर देशविदेशातही पसरली आहे. मंदीराजवळ मोठी विहीर आहे. समोर शेतात आंब्याची, चिंचेची झाडं आहेत. आजूबाजूला शेतात बारमाही पिकं डोलतात. हे स्थळ शालेय सहलिंसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मी विद्यार्थी असतांना अनेकदा सहलिला डबे घेवून, शिक्षक झाल्यावर विद्यार्थ्यांच्या सहलीसोबत, गावात कुणी भेट द्यायला आलं, तर त्यांचे सोबत पत्रकार म्हणून आणि आता निवृत्त झाल्यावर, मनाची शांती शोधत, इथं नियमित येतो. या मंदिरामुळेच इथला परीसर भवानीचा मळा म्हणून ओळखला जातो.
दिव्यत्वाची, जेथे प्रचिती,
तेथे कर माझे, जुळती !
येथील श्रीमंत दानशूर स्व. रामदासशेठ लक्ष्मणशेठ भाटीया यांनी १९५५ साली या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे. यासाठी त्यांनी दोन हजार रु खर्च केले होते. ज्याचे आजचे सोन्याच्या भावावरुन मुल्य १० लाखावर होते. तेव्हा सोनं १०० रु तोळं होतं जे आज ५० हजार रु तोळं आहे. पैसा असून माणूस श्रीमंत होत नाही. तर, मनाचा मोठेपणा, सर्व समावेशक विचार सरणी आणि दातृत्वाची वृत्ती माणसाला श्रीमंत करते. तश्या अर्थाने, स्व. रामदासशेठ श्रीमंत होते असे मी म्हणतोय. त्यांनीच धरणगावात सरकारी दवाखान्यात त्या काळाची गरज ओळखून आपल्या धर्मपत्नींच्या सौ. गंगाबाई भाटीया यांच्या नावे १४ नोव्हेंबर १९५० ला ४० हजार रुच्या देणगीतून सुतिकागृह बांधून दिले होते. ज्याचे आजचे मुल्य २ कोटी रु. होते. याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या रु १५ हजाराच्या देणगीतूनच येथील पी. आर. हायस्कूलची नवीन, भव्य इमारत उभी राहिली आहे. ज्याचे आजचे मुल्य ७५ लाख होते. या देणग्यांवरुन स्व. रामदास शेठ यांच्यातल्या सुजाण शिक्षणप्रेमी, संवेदनशील आरोग्य रक्षक आणि धर्माभिमानी, उदार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. आजचे नेते, पुढारी आणि समाजसेवक त्यांच्या या दिव्य व्यक्तिमत्वाचा आणि दानशूरपणाच्या जवळपास, दूरदूरपर्यंत कुठेही दिसत नाहीत.
मुरदासजी बाबांनी लावला लळा,
निसर्गात फुलवला भक्तिचा मळा :
या मंदिरावर पन्नास वर्षांपूर्वी स्वामी मुरदासजी महाराज आले होते. धिप्पाड देहयष्टी, गोरवर्ण-तेज:पूंज रुप, वाणीत मनमोहून घेणारं माधुर्य आणि शत्रुलाही क्षणात मित्र करुन घेणारा लाघवी स्वभाव. या “देवरुप” गुणांनी बाबा सर्व गावाला परीचित झाले. त्यांनाही मंदिर, मंदिर परीसर आणि मातेच्या कृपा, दर्शनाने अशी भुरळ घातली, की ते येथेच स्थाईक झाले. त्यांनीच येथे यात्रा-उत्सव सुरु केले. यातूनच या भागातली वर्दळ वाढली. या सत्पुरुषांना भेटण्याचं, बोलण्याचं मला भाग्य लाभलं आहे. सकाळ-संध्याकाळ शूचिर्भूत होवून ते देवीची पूजा, आरती करु लागले. हा देवीचा नित्यक्रम झाला. नवचंडी यज्ञ, देवीचा भंडारा, नवरात्री उत्सव म्हणजे गांवकऱ्यांचे लोकोत्सव झाले. नवरात्रीत येथील हिरवाईने नटलेली पायवाट माणसांनी फुलून जावू लागली. अनेक नागरीक देवीचे नियमित भक्त झाले. येथील सुप्रसिद्ध व्यापारी, उद्योजक जिवनआप्पा बयस देवीचे निस्सीम भक्त आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अश्या तिन्ही ऋतूत, त्यांची रोजची दिनचर्या, भवानी मातेच्या दर्शन-पूजनानेच सुरु होते. यात आजही खंड पडलेला नाही.
मन वैराग्याने, झाले रिक्त,
भुराशेठ झाले, देवीचे भक्त :
सध्या देवीमातेची पूजा जिवनआप्पा यांचे काका रमणसिंह रामलालसिंह बयस (भुराशेठ) हे श्रध्देने करीत आहेत. नवरात्रातीत घटस्थापनेपासून ते नवरात्र संपेपर्यंत त्यांचा मुक्काम आई भवानी मंदिरात असतो. देवीच्या सानिध्यात मनाला वैराग्य प्राप्त होतं आणि आत्मिक समाधान मिळतं असं ते म्हणतात. त्यांच्याच देखरेखीखाली मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. घटस्थापनेला मंदिरात नवचंडीका व्रताला सुरवात होत आहे. कोरोनाचं सावट बऱ्यापैकी दूर झालं आहे. त्यामुळे हा परीसर पुन्हा एकदा आईभवानीच्या भक्तांनी फुलूनजाणार आहे.
संसार है एक नदिया, सुख दुःख दो किनारे है,
ना जाने कहा जाये, हम बहती धारा मे :
या गीतातील ओळी, संसाराची अनाकलनीयता व्यक्त करतात. जीवन हे नदी सारखं आहे. सुख- दुःख तिचे दोन काठ आहेत. आणि, आपण त्यावर सतत हेलकावे खात असतो. कधी कोणत्या तिरावर असू, हे आपल्या हातात नसतं. ते सर्वस्वी त्या सर्वशक्तीमान, नियंत्याच्या हातात असतं. ज्याला आपण देव, देवी, गाॅड, अल्लाह, गुरुसाहेब म्हणतो. सुख-दुःखाच्या या फेऱ्यात फिरतांना, मनाला हवी असते शांती. मनाच्या शांतीसाठीच, अशी स्थळं आपल्या पूर्वजांनी गावापासून, कोलाहलापासून दूर, बांधून ठेवली आहेत. अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर… एका दिव्य शक्तीचे ऋण मानण्यासाठी, अश्या ठिकाणी, क्षणभर विसावायलाच हवं.
ए आई, करुणामई, …..मला सौख्यात राहू दे,
एकदाच गं, डोळे भरुन, तुझं रुप मला पाहू दे.!
आज घटस्थापनेच्या निमित्ताने, विनम्र होवून, हा भना… त्या जगन्मातेला दर्शनाचं साकडं घालतो आहे. कारण, तिची कृपा होईल, ती बोलवेल तर आणि तरच, आपल्याला तिचं दर्शन घडतं, असं मी मानतो. अन्यथा, प्रवासात आपण अनेकदा, अनेक तिर्थस्थानांजवळून जातो. पण, आपण त्यांचं साधं दर्शनही घेव शकत नाही. इतकं आपण, आपल्या कामात, व्यापात, संसारात व्यस्त असतो. अश्या लोकांना ती विश्वनियंत्रीत करणारी शक्ती, त्यांच्याच व्यवस्थेत, अधिकाधिक गुरफटवून टाकत असते. त्या सर्व शक्तिमान निर्मिकेवर विश्वास ठेवून, अनन्य भावने जो तिच्यासमोर विनम्र होतो, त्यांना ती आपल्या कृपेने, अन्योन्य मार्गांनी बोलावून घेते. दर्शन देते. यालाच तर आपण “योगायोग” असं गोंडस नाव देतो. मच्या आयुष्यातही हा “योगायोग” वारंवार येवो, अशी त्या माताराणीकडे मी विनम्र प्रार्थना करतो.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)