जळगाव (प्रतिनिधी) इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे.थीम महाविद्यालय मेहरून जळगावच्या सेमिनार हॉ मध्ये बजमे उर्दु अदब या संस्थेतर्फे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यात आजमी आदीलाबादी यांना डॉक्टर अल्लामा इक्बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. त्यानंतर शौक जलगानवी यांना मीर तकी मीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काझी मुश्ताक अहमद यांना मुंशी प्रेमचंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तसेच जळगाव येथील पत्रकार मुश्ताक करिमी यांना असगर अली जामी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सिपास नामा, प्रमाणपत्र, शाल बुके असे होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने काजी मुजममिल नदवी यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दु कारवा मुंबईचे अध्यक्ष फरीद अहमद खान हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील ख्यातनाम कवी लेखक साहित्यिक शमीम तारीख हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर अब्दुल करीम सालार यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इफ्तेखार अहमद तसेच साबीर मुस्तफाबाद यांनी आपल्या चांगल्या शैलीत केले. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर इकबाल शाह, एजाज मलिक, अब्दुल अजीज सालार, डॉक्टर ताहेर शेख, मुफ्ती मोहम्मद हारून नदवी, हाजी अन्सार अहमद, मोनोद्दीन उस्मानी, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हा पुरस्कार सोहळा २०२१ साला साठी होता. तसेच सन २०२२ मध्ये ही अशाच प्रकारचे पुरस्कार साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, यांना देण्यात येणार आहे. त्यात आजिझ बियावली, रशीद कास्मी, सईद पटेल, यांना प्रदान करण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार यांनी सर्वांसमोर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुफती हारून नदवी, एजाज अब्दुल गफ्फार मलिक, रिजनल डायरेक्टर मौलाना आजाद यूनिवर्सिटी हैदराबाद मुंबई सेंटर अब्दुल बरकात, तसेच पुरस्कार प्राप्त मुश्ताक कारीमी, काजी मुश्ताक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मुंबई येथील कवी, लेखक, पत्रकार, शमीम तारीख यांनी आपल्या जोरदार शैलीत पारितोषिक म्हणजे काय? पारितोषिकचे महत्त्व काय? हे सर्वांना पटवून दिले. पारितोषिक हा ईश्वराला खूष करणारा असावा. तुम्ही असे कार्य करा की ज्यामुळे तुम्ही ईश्वरा पुढे सन्मानाने उभे राहाल तो खरा पारितोषीक समजावा.
त्यानंतर अध्यक्षीय भाषणात फरीद अहमद खान यांनी सांगितले की, पारितोषिक मिळाल्यानंतर पारितोषिक स्वीकारणाऱ्याची जबाबदारी अजून वाढून जाते. त्याला समाजामध्ये अजून जोमाने काम करावे लागेल. आणि इथेच न थांबता त्यांनी चांगले कार्य करीत राहावे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अल्फैज फाऊंडेशनचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये जळगाव येथील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कवी, साहित्यिक, पत्रकार, तसेच जळगाव येथील थोर मोठें, व्यक्ती, यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.