भोपाळ (वृत्तसंस्था) एका दारुड्याने दारू (liquor) चढत नाही म्हणून चक्क गृहमंत्र्यांकडे भेसळीची तक्रार (Complaint) केली आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील उज्जैनममध्ये घडला. दारुच्या आहारी गेलेल्या या व्यक्तीने पूर्ण बाटली प्यायल्यानंतर देखील दारु चढत नसल्याची तक्रार केली आहे. त्याने थेट दारुची विक्री करणाऱ्यावर आरोप केलाय की दारुत पाणी टाकले जाते आणि त्याची विक्री होते.
तक्रारदार लोकेंद्र सेठिया यांनी 12 एप्रिल रोजी दोन क्वार्टर देशी दारू पिऊन अबकारी पोलीस ठाणे गाठलं. क्वार्टरमध्ये दारू नसून पाणी असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यांनी केवळ लेखी अर्जच दिला नाही, तर पुराव्यासाठी दोन क्वार्टर दारूही सादर केली. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर या दोन क्वार्टरची तपासणी करा आणि ठेकेदाराने केलेल्या या फसवणुकीची दखल घेऊन कारवाई करा, असं त्यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेत दोषी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं.
6 मे पर्यंत त्यांच्या तक्रारीवर कारवाई झाली नसल्याने आता त्यांनी ग्राहक मंचात जाणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले- ‘मद्यपींना न्याय मिळावा यासाठी मला याप्रकरणी कारवाई हवी आहे. मी दारू पितो आणि पैसेही कमावतो. पण, जे फक्त मद्यपान करतात, त्यांचें काय? त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे. माझ्यासोबत जे घडलं ते इतर कोणत्याही ग्राहकासोबत घडू नये अशी माझी इच्छा आहे. मी 20 वर्षांपासून मद्यपान करत आहे. त्यामुळे भेसळ आहे की नाही हे मला समजतं’. एक महिना उलटूनही काहीच कारवाई झाली नाही, तर ग्राहक मंचाकडे जाणार असल्याचं लोकेंद्र यांनी सांगितलं.
तक्रारदार लोकेंद्र सेठिया हे आर्य समाज मार्ग, बहादूरगंज येथे राहतात. त्यांनी फिर्यादीत सांगितलं की, १२ एप्रिल रोजी मी माझ्या मित्रासोबत क्षीर सागर येथील प्रीती जैस्वाल यांच्या ठेक्यातून ४ क्वार्टर देशी दारू घेतली. जोडीदार आणि मी दोन दोन क्वार्टर प्यायलो तेव्हा कळलं की ही दारू नसून पाणी आहे. त्याला आम्ही विरोध केला असता, ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांमार्फत सांगितलं की जे करायचंय ते करा, इथे असंच आहे.