श्रीलंका (वृत्तसंस्था) एका व्यक्तीच्या अंगणात चक्क विहीर खोदताना जगातला सर्वात मोठा नीलम खडक म्हणजेच Sapphire Cluster सापडला आहे. काही मजुरांना विहीर खोदताना हा नीलम सापडला आहे. ही घटना श्रीलंकेच्या रत्नपुरा परिसरातील आहे. श्रीलंकन अधिकाऱ्यांनी या विषयीची माहिती दिली.
नीलम जगातल्या मौल्यवान रत्नांपैकी एक आहे. श्रीलंकेच्या या भागात रत्नं आणि मौल्यवान दगड मोठ्या प्रमाणात मिळतात. या जागेच्या नावावरूनच त्याठिकाणचं वैशिष्ट्यं लक्षात येतं. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात या फिकट निळ्या रंगाच्या नीलमचं मूल्य जवळपास १०० मिलियन डॉलर (सुमारे साडे सात अब्ज रुपये) असू शकतं. या नीलमचं वजन ५१० किलो एवढं आहे. त्याला ‘सेरेंडिपिटी सफायर’ असं नाव देण्यात आलं आहे. याचा अर्थ नशिबानं मिळालेला नीलम असं आहे.
कदाचित हा नीलम ४० कोटी वर्षांपूर्वी तयार झाला असावा
“मी एवढा मोठा नीलम यापूर्वी कधीही पाहिला नाही. कदाचित हा ४० कोटी वर्षांपूर्वी तयार झाला असावा,” असं प्रसिद्ध रत्नतज्ज्ञ डॉक्टर जॅमिनी झोयसा यांनी सांगितलं. मात्र या नीलमची कॅरेट व्हॅल्यू किंवा मूल्य खूप जास्त असलं तरीही, क्लस्टरच्या आतील रत्न एवढे मौल्य असतीलच असं नाही, याकडंही तज्ज्ञांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
श्रीलंकेमध्ये कोरोना व्हायरसमुळं रत्न उद्योगाला मोठा फटका मिळाला आहे. अशा परिस्थितीत हा विशाल आकाराचा नीलम सापडला आहे. ‘नशिबानं मिळालेला नीलम’ आंतरराष्ट्रीय ग्राहक आणि तज्ज्ञांचं लक्ष पुन्हा एकदा वेधण्यासाठी फायदेशीर ठरेल असं रत्नाचा व्यापार करणाऱ्यांचं मत आहे.
“हा नीलम अगदी खास आहे. कदाचित हा जगातील सर्वात मोठा नीलम असू शकतो. याचा आकार आणि किंमत पाहता तज्ज्ञ आणि संग्रहालयांचं लक्ष याकडं वेधलं जाईल,” असं नॅशनल जेम अँड ज्वेलरी अथॉरिटी ऑफ श्रीलंकेचे प्रमुख तिलक वीरसिंहे यांनी म्हटलं.















