जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करंज येथील शेतकर्यांची केळी इराण येथे आज रवाना झाली असून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आवर्जून भेट देऊन त्या शेतकर्याचे कौतुक केले.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकर्याच्या शेतातील केळी आज इराण येथे रवाना झाली. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त झाला असतांना आता काही प्रगतीशील शेतकर्यांसाठी निर्यातीचा पर्याय उपलब्ध झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी करंज येथे जाऊन प्रदीप पाटील यांचे कौतुक केले. त्यांचा आदर्श घेऊन परिसरातील शेतकर्यांनी निर्यातक्षम केळीची लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. गजानन ऍग्रो, पोलन ऍग्रो मिनरल व धर्ती कृषी संवर्धन यांच्या केळी विदेशात पाठविण्यात आल्याने प्रतापराव पाटील यांनी त्यांचेही कौतुक केले.
याप्रसंगी पोलन ऍग्रो व धर्ती संवर्धनचे प्रतिनिधी सौरभ चौगुले, योगेश जिंदमवर, संग्राम कुरणे व तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामदास पाटील, हिलाल पाटील, अनिल सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय सपकाळे, सुनील सपकाळे, शरद पाटील, सुरेश सपकाळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.