मुंबई (वृत्तसंस्था) वीजेचं बिल भरायचं असेल आणि तुम्हाला अनोळखी लिंक किंवा नंबर आला तर त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. खबरदारी न घेता मोबाईलवरून वीजबिल भरणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या एका डॉक्टरला अजब पद्धतीनं गंडा घालण्यात आलाय. वीजबिल भरण्यासाठी मेसेज पाठवून त्याद्वारे अवघ्या तासाभरात त्यांच्या खात्यातून 9 लाख रुपये चोरट्यांनी लांबवले.
त्यानंतर एका वृत्तसंस्थेने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी अनुराग शाह यांनाही असाच मेसेज आला. मग जागरुक वाहिनी या नात्यानं आम्ही या फ्रॉड मेसेजचा भांडाफोड करण्याचं ठरवलं. त्यानुसार अनुराग यांनी मेसेजमध्ये असलेल्या नंबरवर फोन केला.
ठकसेन – मी तुम्हाला प्रक्रिया सांगतो. तुमच्या मोबाईलमधलं प्ले स्टोअर ओपन करा.
रिपोर्टर – हां… प्ले स्टोअर ओपन केलं.
ठकसेन – तिथं सर्च करा. अपडेट क्विक सपोर्ट
ठकसेन – टीम व्ह्यू क्विक सपोर्टवर क्लिक करा…
ठकसेन – अॅप ओपन करा आणि अॅग्री अँड कंटिन्यू करा…
ठकसेन – आयडी नंबर सांगा…
रिपोर्टर – आयडी नंबर 189284679
ठकसेन – 189284679?
आम्ही मुद्दामच खोटा आयडी या ठकसेनाला दिला… हे लक्षात येताच त्यानं थेट शिव्या द्यायला सुरूवात केली.
ठकसेन – तुझ्या XXXXXXXXX
रिपोर्टर – शिव्या देऊ नका !
ठकसेन — तुझ्या XXXXXXXXX
रिपोर्टर – तुमची पोलिसांकडे तक्रार करेन…
ठकसेन – पोलिसांच्या XXXXXXX
याखेरीज ठकसेनांनी आणखी एक नवी पद्धत शोधून काढलीये
‘एका वृत्तसंस्थे’कडून पर्दाफाश
तुम्ही कोणत्याही अॅपवरून कर्ज घेतलं नसेल तरी तुम्हाला मेसेज येतो. यात तुमच्या नावावर कर्ज असून ते फेडलं नाही, तर मोठा भुर्दंड पडेल अशी धमकी दिलेली असते. आपण कर्ज घेतलं नाहीये, हे माहिती असूनही केवळ कुतुहलापोटी लिंक क्लिक केली तरी मोबाईलमधला डेटा हॅक होतो आणि नंतर बँक खात्यांवर डल्ला पडलाच म्हणून समजा. त्यामुळे एखादं बिल भरण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी मेसेजवर फोन नंबर किंवा अनोळखी लिंक आली, तर त्याला प्रतिसाद देऊ नका. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. सायबर ठकसेन रोज नवनवे मार्ग अवलंबत असताना आपल्यालाही तितकंच सावध राहणं आवश्यक आहे.