चंद्रपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरुन ७ जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये ४ महिला आणि ३ वृद्धांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांची सुटका केली असून सातपैकी पाच जणांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाणीचा प्रकार पुढे आला आहे. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. साहेबराव उके (वय ४८), शिवराज कांबळे (वय ७४), एकनाथ उके (वय ७०), शांताबाई कांबळे (वय ५३), धम्माशीला उके (वय ३८), पंचफुला उके (वय ५५), प्रयागबाई उके (वय ६४) अशी पीडितांची नावे आहेत.
पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत पीडितांची सोडवणूक केली. पोलिसांनी आतापर्यंत एकूण बारा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.