धाराशिव (वृत्तसंस्था) पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील बलसुरतांडा येथे सोमवारी (दि. २१) घडली. त्यामुळे महिलेच्या माहेरच्या मंडळींनी देखील मुलीला का मारलं?, म्हणत मुलीच्या सासूसह जावयालाही बदडून काढले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील ७ जणाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बलसुरतांडा येथील अर्जुन तानाजी जाधव (वय २५ वर्ष), छाया तानाजी जाधव (वय ४५ वर्ष), तानाजी जाधव (वय ५० वर्ष), अविनाश चव्हाण (वय३८ वर्ष) यांनी अर्जुन जाधव यांची पत्नी शिल्पा अर्जुन जाधव (वय २२ वर्ष) हिला मारहाण केली. शिल्पा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली.
दरम्यान, शिल्पा यांनी सदरची घटना तालुक्यातील मूळज तांडा येथे असलेल्या माहेरी वडिलांना सांगितली. त्यामुळे वडील हरी राठोड, आई चांगुना हरी राठोड, लखन चव्हाण यांनी मुलीला मारहाण केल्याच्या रागातून सासू छाया तानाजी जाधव, अर्जुन जाधव यांना बेदम मारहाण केली. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.