बीड (वृत्तसंस्था) अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत डोक्यात खोऱ्याचा दांडा मारत खून केला. त्यानंतर आरोपी पतीने स्वतः नेकनूर पोलीस ठाण्यात येऊन ‘साहेब…मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा’, अशी कबुली दिली. मंगल गुंडीराम भोसले (४५) असे मयत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह पडलेला होता. ही थरारक घटना बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथे मंगळवारी (दि. २२) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. मंगल भोसले असे मयत महिलेचे नाव आहे. त्या अंगणवाडी सेविका आहेत.
पती गुंडीराम हरिभाऊ भोसले (५५, राधावज्याचीवाडी, ता. बीड) व त्यांच्यात सतत वाद व्हायचे. गुंडीराम हा मंगलच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालायचा. मंगळवारी सकाळी मंगल या शेतात गेलेल्या होत्या. गुंडीरामही शेतात गेला. शेतात दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागात गुंडीरामने मंगलच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. डोक्यात जबर मार लागल्याने मंगल जमिनीवर कोसळल्या अन् क्षणातच गतप्राण झाल्या. त्यानंतर गुंडीरामने नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्याने आपण बायकोला मारून आल्याची कबुली दिली.
पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. मंगल यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. धावज्याचीवाडी येथे मंगल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुलगा अविनाश भोसले याच्या फिर्यादीवरून वडिलांवर नेकनूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.