चंद्रपूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर पर्यटनासाठी आलेल्या नागपूरच्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नागपूर व यवतमाळचे पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यामधील पेरजागड परिसरातील सातबहिणी पहाडावर गेले होते. त्यावेळी अचानक मधमाशांनी चढवला. यात ६२ वर्षीय अशोक विभीषण मेढे व ५८ वर्षीय गुलाबराव पोचे (रा. नागपूर) यांचा मृत्यू झाला तर सहा महिन्यांचा चिमुकला पार्थ सुदीप कोठारी, ३० वर्षीय सुदीप कोठारी, दीपिका सुदीप कोठारी रा. वणी जि. यवतमाळ तसेच ४२ वर्षीय मनोज राजूरकर रा. नागपूर हे जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती सायंकाळी वन विभागाला मिळताच तात्काळ वन विभागाची टीम, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तळोधी, नागभीड पोलिस व स्वाब नेचर केअर संस्थेचे पदाधिकारी व सदस्य घटनास्थळी पोहोचले. यावेळी गुलाबराव पोचे यांना रुग्णवाहिकेत नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर डोंगरावर मधमाशांच्या दंशामुळे अशोक मेंढे यांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास तळोधी पोलिस व वन विभाग करीत आहे.