जळगाव (प्रतिनिधी) शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात – घुसून कागदपत्रे चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यात अॅड. विजय भास्कर पाटील यांना बेकायदेशीररित्या अटक केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलिस महासंचालकांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांना बजावलेल्या नोटीसमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना दि. २१ मार्च रोजी – सुनावणीला हजर राहून लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अॅड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात रविवार दि. ९ मार्च रोजी पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये अॅड. विजय पाटील यांनी सांगितले की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयातून – कागदपत्रे चोरीप्रकरणी दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच सकाळी आठ वाजता जिल्हापेठ पोलिसांनी आपल्याला घरून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत डांबून ठेवले आणि संध्याकाळी पाच वाजता मला अटक दाखविले.
गुन्हा दाखल नसताना त्यापूर्वीच आपल्याला कुठलीही नोटस न देता आपल्या बेकायदेशीरित्या ताब्यात घेण्यात आले असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यात जे कलम लावले आहे, ते सात वर्षांच्या आत शिक्षा असलेले कलम असून त्यात अटक करता येत नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. रजिस्टर पोलिसांकडे तरीही गुन्हा दाखल जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जी कागदपत्रांमधील हजेरीचे रजिस्टर चोरीचा गुन्हा आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. ते रजिस्टर यापुर्वीच आपण जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमा केले आहे. त्याबाबतचा पंचनामा देखील आपल्याकडे असून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी देखील आहे. मात्र तरी देखील ती कागदपत्रे चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल केल्याचे अॅड. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांकडून जळगावात जामनेर पॅर्टन
जामनेर तालुक्यात राजकीय दबावतंत्र वापरून पोलिसांनी अनेकांवर सुमारे अडीचशे ते तीनशे गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल करुन अनेकांना त्रास दिला जात आहे. तोच पॅर्टन पोलीस आता जळगावात देखील राबवित असल्याचा आरोप अॅड. विजय पाटील यांनी केला. तसेच राजकीय दबावापोटी पोलिसांनी कागदपत्रे चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावाही अॅड. पाटील यांनी केला आहे.