भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कनाशी येथील राजेंद्र देवराम पाटील या शेतकऱ्याने देव्हारी शिवारात मका कणसे तोडून चारा ठेवून दिला होता. मात्र शेतात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मका कणसांसह चारा जळून खाक झाला आहे.
मका पिकाला लागलेल्या आगीचा डोंब उसळताच शेजारच्या शेतात असलेल्या कुटुंबासह २५ ते ३० शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांनी आग विझवली. घटना शुक्रवारी दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास घडली. देव्हारी शिवारात शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रात मका पीक घेतले होते. सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस, वारा असल्याने सर्वच शेतकरी धास्तावले आहेत. नुकसानीची टांगती तलवार रब्बीतील पिकांवर आहे. राजेंद्र पाटील या शेतकऱ्यानेही मक्याची कणसे तोडून जमिनीवर पसरली होती, तर चाराही कापून वाळण्यासाठी काही दिवसांपासून जमिनीवर ठेवला होता. काही पीक उभे आहे. मात्र शुक्रवारी शॉर्टसर्किट झाल्यामुळे मका पिकाचे जळून नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली व आग आटोक्यात आणल्याने या शेतकऱ्याचे दीड एकर क्षेत्राचे होणारे नुकसान टळले. ही आग आटोक्यात आली नसती तर शेजारच्या शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले असते. दरम्यान, देव्हारी शिवारातील शेतात दीड एकर मका पिकाची लागवड केली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसे व चारा असे जवळपास २० ते ३० टक्के नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने घटनेची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा व भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केली आहे.