जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार संशयित आरोपींनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्यासह संगनमत करून संपूर्ण अपहार केला आहे. पतसंस्थेच्या अभिलेखामध्ये चुकीच्या नोंदी करून ते अभिलेख बरोबर असल्याचे भासविणे, बनावट शपथपत्रे व कागदपत्रे तयार करून ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासारखी कृत्य केल्याचा संशयितांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
बीएचआर घोटाळ्याच्या तपासात सुजित बाविस्कर उर्फ वाणी, धरम सांकला,महावीर जैन,सुरज झंवर आदींसह जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, कुणाल शहा, योगेश सांकला, प्रकाश वाणी, अनिल पगारीया, माहेश्वरीसह इतर व्यक्तींसोबत संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी, मुख्य कार्यालय जळगाव ही पतसंस्था अवसायनात गेल्यानंतर संशयित आरोपींनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून फिर्यादी व त्यांच्याप्रमाणे पतसंस्थेच्या इतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा परत मिळण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील ठेवीच्या मूळ पावत्या जमा करणेकामी प्रवृत्त केले.
तसेच संशयित आरोपींनी ठेवीदारांच्या ठेवी स्विकारून त्याबदल्यात ठेवीदारांना ठेवीच्या रकमेचा पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या ठेवी बेकायदेशिरपणे कर्जधारकांची कर्ज निरंक करणेकरीता वापरल्या संशयित आरोपींनी पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीकरीता बेकायदेशिरपणे लिलाव प्रक्रिया राबवून ठेवीदारांच्या देवीच्या पावत्या मालमत्ता खरेदीधारकांच्या पैशाचे बदल्यात जमा करून घेवून पतसंस्थेच्या मालमत्तेची बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विक्री केली व लिलाव प्रक्रिया सदोष असल्याचे भासविले.
मल्टिस्टेट को. ऑप. अॅक्ट कलम ९० रुल २९ नुसार अवसायनात गेलेल्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम समान तत्वाने वाटप करणे आवश्यक असताना संशयित आरोपींनी तसे न करता ठेवीदारांच्या पैशांचा गैरव्यवहार केलेला आहे. असे करताना आरोपींनी पतसंस्थेच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरबदल करून त्यामध्ये मागील तारखेच्या नोंदी घेतल्या याचप्रमाणे पतसंस्थेच्या अभिलेखामध्ये चुकीच्या नोंदी करून ते अभिलेख बरोबर असल्याचे भासविले. संशयित आरोपींनी बनावट शपथपत्रे व कागदपत्रे तयार करून ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. अशा प्रकारे संशयित आरोपींनी फिर्यादी व त्यांची बहीण यांची मिळून गुंतविलेली एकुण १६,९०,१४२/ रु. अधिक तपासात आज पर्यंत निष्पण अंदाजे रक्कम रु. ६१,७३,९८,०२१/- अशी एकूण रक्कम रु.६१,९०,८८,१६३/- ची ठेवीदारांची फसवणूक करून भा.दं.वि.क. ४०६, ४०९, ४२०, ४६४ ४६५. ४६७, ४६८, ४७१, ४७४ ४७७(अ) १२० (ब) ३४, २२५ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप पोलिसांनी ठेवला आहे.