जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर सरकार आणि बचावपक्षाचा आज तब्बल तिसऱ्या दिवशी युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर आज अन्य संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या जामीन अर्जावर युक्तीवादास सुरूवात झाली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को अॉप सोसायटीमधील घोटाळयाप्रकरणी अटकेत असलेला सीए महावीर जैन याच्या जामिन अर्जावर आज (बुधवार) न्यायालयात सरकार व बचावपक्षाने युक्तीवाद पुर्ण केला. यावेळी बचाव पक्षाने सरकार पक्षाच्या युक्तिवादाला उत्तर दिले. त्यानुसार तत्कालीन ईओडब्ल्यूचे अधिकारी पो.नि.सुनील कुऱ्हाडे यांनी ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे, त्याच अवसायक कंडारेला फॉरेंसिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी सीए महावीर जैनला का द्यायला लावली?, या सरकार पक्षाच्या आरोपावर बचाव पक्षाने उत्तर दिले की, काबरा फर्ममधील चोरडिया यांनी फॉरेंसिक ऑडिटचा डिप्लोमा केलेला होता. त्यामुळे त्यांना फॉरेंसिक ऑडिटची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच फॉरेंसिक ऑडिटचे बिल हे अवसायक कंडारे यांनी नव्हे तर बीएचआर पतसंस्थेने दिले आहे. जर कुराडे यांची भूमिका संशयास्पद होती तर पोलिसांनी त्यांना का आरोपी केले नाही?, असा बचाव पक्षाने सवाल उपस्थित केला.
यांनतर संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या अर्जावर युक्तीवादास सुरूवात झाली. ठाकरेचे वकील अॅड. उमेश रघुवंशी यांनी जोरदार बाजु मांडत म्हटले की, ठाकरे याचा या गुन्ह्याशी काहीही संबध नाही. पोलिस त्याला एजंट म्हणत आहेत, परंतू त्यांनी याबाबत तसा कोणताही पुरावा कोर्टासमोर सादर केलेला नाही. वास्तविक बघता ठाकरे यांनी बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्या भ्रष्टाचार, कर्जदारांचे बेकायदेशीर मॅचिंग विरुद्ध अनेकवेळा दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. ठेवीदारांच्या हितासाठी संस्था स्थापन करुन त्या माध्यमातून काम करीत अाहेत. या संस्थेमुळे बीएचआरच्या संचालकांना एमपीडीए लागून त्यांच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या. ठाकरे यांनी कुठेही पैसे घेतले असतील तर त्यांचा बँकेचे सर्व डिटेल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे पोलिसांना आता अधिक काही मिळण्यासारखेराहिलेले नाही. त्यामुळे जामीन द्यावा अशी विनंती करण्यात आली. दरम्यान, यावर पुढील सुनावणी आता १५ जानेवारी रोजी होणार आहे. पुणे विषेश न्यायालयाचे न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर या गुन्ह्यात अटकेत असलेला कमलाकर कोळी याला ५ जानेवारी रोजी पुणे न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे. तसेच सुजित बाविस्कर (वाणी) याच्या अर्जाचा युक्तीवाद पुर्ण झाला असून त्यावर अद्याप आदेश झालेला नाही.