जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या जामीन अर्जावर आज दुसऱ्या दिवशी युक्तीवाद पूर्ण झाला. याआधी सीए महावीर जैन आणि सुजित बाविस्कर (वाणी) या दोघांच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पुर्ण झाला असून त्यावर अद्याप आदेश झालेला नाही. त्यामुळे तिघांच्या जामीन अर्जावर एकाच वेळी निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, शिक्रापूरच्या गुन्ह्यात ठाकरेच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बचाव पक्षाने पत्रकार अर्णब गोस्वामी बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देखील दिला.
आज संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या अर्जावर युक्तीवादास सुरूवात झाल्यानंतर सरकार पक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण यांनी म्हटले की, ठाकरे आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांचे २०१० पासून संबंध आहेत. ठाकरे विरोधात ठेवीदारांनी राज्यमंत्री, सहकारमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला तक्रारी केलेल्या आहेत. पोलिसांना ठाकरेच्या घरातून ठेवीदारांच्या मूळ पावत्या तसेच २० टक्के कमिशन देण्याबाबतचे अफेडेव्हीट मिळून आले आहेत. तर एका ठेवीदाराच्या खात्यातून ठाकरेच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. ठाकरे स्वत: बीएचआर पतसंस्थेचा थकीत कर्जदार आहे. ठाकरे यांनी निवडणूक लढली असून ते प्रभावशाली व्यक्ती असून जामीन मिळाल्यास साक्षीदार तथा फिर्यादी यांच्यावर दबाव आणू शकतात. पुरावे नष्ट करू शकतात किंवा बनावट पुरावे तयार करू शकतात, असे मुद्दे सरकार पक्षाने मांडले.
दुसरीकडे अॅड. उमेश रघुवंशी यांनी विवेक ठाकरे याच्याबाजूने जोरदार युक्तिवाद करत म्हटले की, पहिल्या पोलीस रिमांडमध्ये सरकारपक्षाने हेच मुद्दे मांडले होते. त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारलेली आहे. त्यामुळे त्याच मुद्यांवर जामीन अर्ज कसा विरोध केला जाऊ शकतो. ठाकरे यांनी आपल्या जबाबात आधीच बीएचआर पतसंस्थेचा थकीत कर्जदार असल्याचे मान्य केले आहे. मुळात ठाकरे हे ठेवीदार यांच्यासाठी कायदेशीर लढाई लढत असल्यामुळे त्यांच्या घरात ठेवीदारांचे कागदपत्र मिळणे स्वाभाविक आहे. पोलिस त्याला एजंट म्हणत आहेत, परंतू त्यांनी ठाकरे यांच्याशी संबंधित १२७ प्रकरणात एकही पावती २० टक्क्यात मॅचिंग केल्याचा पुरावा सादर केलेला नाही. ठाकरे यांनी बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्या भ्रष्टाचार, कर्जदारांचे बेकायदेशीर मॅचिंग विरुद्ध अनेकवेळा दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा कंडारेशी कसे संबंध राहू शकतात. ठाकरे हे ठेवीदारांच्या हितासाठी संस्था स्थापन करुन त्या माध्यमातून राज्यभर काम करीत आहेत. ठाकरे यांनी निवडणूक लढवली म्हणजे गुन्हा केला का?, असे म्हणत अॅड. उमेश रघुवंशी यांनी जामीन मंजूर करावा अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, सीए महावीर जैन आणि सुजित बाविस्कर (वाणी) या दोघांच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पुर्ण झाला असून त्यावर अद्याप आदेश झालेला नाही. दरम्यान, तिघांच्या जामीन अर्जाबाबत पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या आदेशाकडे आता लक्ष लागून आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामी बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला
आज संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व अर्जावर देखील युक्तीवाद झाला. यावेळी अॅड. उमेश रघुवंशी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी बाबत सुप्रीम कोर्टाने २७ नोव्हेंबर २०२० मध्ये दिलेल्या निर्णयाचा दाखला देखील दिला. यानुसार एकाच प्रकरणाबाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादीत नोंदता येत नाही. डेक्कन आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील तक्रारीत विवेक ठाकरे यांना एजंट दाखवले असल्याचे मुद्यांकडे अॅड. रघुवंशी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकार पक्षाकडून अॅड. वाडेकर यांनी कामकाज पहिले.