जळगाव (प्रतिनिधी) येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील बहुचर्चित घोटाळ्यातील संशयित आरोपी अंबादास मानकापे यांचा पासपोर्ट परत मिळण्याचा अर्ज न्यायालयाने नुकताच फेटाळून लावलाय. विशेष म्हणजे बीएचआर घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतरही सहकार क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना राज्यातील एक प्रतिष्ठीत न्यूज चॅनेल दुबईमध्ये पुरस्कार देऊन गौरवणार होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठीच त्यांनी पासपोर्ट परत मिळण्याचा अर्ज केला होता.
दुबईतील पुरस्कार सोहळ्यात जाण्यासाठी हवा होता पासपोर्ट
भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेतील बहुचर्चित घोटाळ्यात औरंगाबादच्या आदर्श उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व सहकार क्षेत्रातील बडे प्रस्थ अंबादास मानकापे पाटील (वय ८२) यांना गुरुवारी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आहेत. परंतू काही दिवसांपूर्वी सहकार क्षेत्रातील एका पुरस्कारासाठी आपली निवड झाली असून पुरस्कार स्वीकारण्याठी दुबईला जायचे आहे. त्यामुळे आपल्याला पासपोर्ट मिळावे, अशी विनंती अंबादास मानकापे यांनी पुणे न्यायलयाकडे केली होती. परंतू यावर विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण जोरदार हरकत घेतली. वयाचे कारण देत मानकापे एकीकडे पुणे आर्थिक गुन्हे शाखेत महिन्यातून दोन वेळेस हजेरी लावण्यातून सूट मिळावी, अशी विनंती करतात. आणि दुसरीकडे तेच मानकापे पुरस्कार स्वीकारण्यासाठी दुबईला जाण्यासाठी पासपोर्ट मागताय. देश विदेशात कोरोनाचे रुग्ण वाढताय आणि मानकापे यांना दुबईला जायचे म्हणत अॅड. प्रवीण चव्हाण यांनी पासपोर्ट परत देऊ नये, अशी न्यायालयास विनंती केली. त्यानंतर १० जानेवारीला न्यायालयाने मानकापे यांची मागणी फेटाळून लावली. दुसरीकडे पुरस्कार देणाऱ्या संबंधित संस्थेला मानकापे यांना बीएचआर घोटाळ्यात अटक झाल्याचे माहित पडताच त्यांनी मानकापेचे नामांकन रद्द केल्याचे कळते.
अंबादास मानकापेवर नेमका काय आहे आरोप?
पोलिसांच्या तपासानुसार अंबादास आबाजी मानकापे (रा. प्लॉट नं. ३१ शिवज्योती कॉलनी एन-६ सिडको औरंगाबाद व प्लॉट नं. ३१८२ आदर्श बँकेच्यावर शिवाजी सोसायटी सिडको, औरंगाबाद) चा गुन्ह्यातील सहभाग मोठा आहे. सदर संशयित आरोपीने बीएचआर पतसंस्था औरंगाबाद शाखा येथे त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्र. ००३२०७००२९० मधील एकूण बाकी कर्ज रक्कम रुपये ३,३१,१६,६३८/- यापैकी रुपये २,७१,१६,६३८ /- हि रक्कम वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमीत किमतीत घेऊन पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करताना त्याने स्वतः ठेवीदारांना सक्षम भेटून पैसे हवे असतील तर पावत्या माझ्याकडे जमा करा, मी माझ्या सोयीने ३० टक्के रक्कम तुम्हाला देईल. त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळाल्याबद्दल स्टँम्पपेपर वर लिहून द्यावे लागेल, असे सांगून पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे, अशी भीती निर्माण करून फक्त ३० टक्के रक्कम देऊन ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले. तसेच सदर पतसंस्थेकडे कर्जाच्या नावाने घेतलेल्या ठेवीदारांचा पैसा पूर्ण परतफेड न करता पतसंस्थेचे अवसायक पहिले आरोपी नामे जितेंद्र गुलाबराव कंडारे, अटक आरोपी सुजित सुभाष वाणी व इतर यांच्याशी संगनमत करून पूर्ण रक्कम परतफेड केल्याच्या खोट्या नोंदी करून ठेवीदारांचा केवळ ३० टक्के रक्कम बेकायदेशीर रित्या अदा करून महाराष्ट्र मल्टीस्टेट को. ऑप अँक्ट २००२ चे नियम २९चे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्पर उल्लंघन केले आहे. इतर ठेवीदारांना सुद्धा त्यांच्या कष्टाची व हक्काची रक्कम समप्रमाणात मिळणे आवश्यक्य असतांना या गैरकृत्यामुळे त्यांना वंचित ठेवल्याचा मानकापे यांच्यावर आरोप आहे.
अंबादास मानकापे सहकार खात्यातील लिपिक ते ‘सहकारमहर्षी’ !
अंबादास मानकापे हे कनिष्ठ लिपिक म्हणून १३ मार्च १९६३ रोजी विभागीय सहनिबंधक (सहकार) कार्यालयात रुजू झाले होते. पुढे पदोन्नतीने ते वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक, विशेष वसुली अधिकारी (श्रेणी १) झाले. सुमारे ३६ वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर ३० सप्टेंबर १९९९ रोजी विशेष वसुली अधिकारी (श्रेणी १) या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. मानकापे यांनी सेवानिवृत्तीनंतर तब्बल चौदा सहकारी, खासगी संस्था स्थापन केल्या. गेल्या २२ वर्षांत ते औरंगाबाद जिल्ह्यातील बडे प्रस्थ म्हणून उदयास आले होते. परंतू बीएचआर घोटाळ्यात त्यांच्या अटकेमुळे मानकापे यांचे एक वेगळे रूप समाजासमोर आले होते.
मानकापे हे निवृत्तीनंतर सहकार खात्यात संस्थांच्या माध्यमातून नव्याने प्रवेश केला. ‘आदर्श’ नावाने सहकारी बँक, पतसंस्था, दूध डेअरी, रुग्णालये, महिला बँक, कॉटन जिनिंगच्या माध्यमातून ते अल्पावधीत ‘सहकाररत्न’ प्रसिद्ध झाले. बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात जवळपास एक लाख महिला सदस्यांचे जाळे तयार केले. शिवाय काही वर्षांपूर्वी एक वर्तमानपत्र सुरू करून त्यांनी त्याचे संपादकपदही मिळवले होते. या अनेक सहकारी संस्था, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार असे शहरात जवळपास १० हजार लोक त्यांनी जोडले.
(विजय वाघमारे, 9284058683)