जळगाव (प्रतिनिधी) आळंदी येथील एका वृद्ध विधवा महिला ठेवीदाराची साडेतेरा लाखांत फसवणूक आणि धमकावल्या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात बीएचआर पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती अविनाश साबळे (वय ६२, रा. आळंदी, ता. खेड, पुणे) असे फसवणूक झालेल्या वृद्ध ठेवीदाराचे नाव आहे.
मालती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती अविनाश साबळे हे एसटी महामंडळात लिपीक पदावर काम करायचे. यांचे सन २००७ मध्ये नदीत पाय घसरुन पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मालती यांनी मुलांचे शिक्षण व लग्नासाठी कोळाणी (ता. खेड) येथील शेती विकली होती. तसेच उर्वरीत रक्कम त्यांनी म्हातारणी आजारांवरील उपचारासाठी बँकेत ठेवले होते. परंतु ठेवीवर १३ टक्के व्याज देणारी जाहिरात पहिल्यानंतर मालती यांनी १२ लाख रुपये बीएचआरच्या आळंदी शाखेत ठेवले. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेत घोटाळा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आळंदीच्या शाखेत जाऊन चौकशी एली असता शाखा बंद पडले होती. २०१६ मध्ये अचानकपणे मालती यांच्या घरी दोन अनोळखी लोक पोहोचले. त्यांनी साांगीतले की, बीएचआर संस्था आता बुडाली असून अवसायक कंडारे हा आमचाच माणुस आहे. तेंव्हा तुम्ही २० टक्के रक्कम घेऊन पावती आम्हाला विकुन टाका. परंतू मालती यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. यानंतर सन २०१९ मध्ये ते दोघं लोक परत मालती यांच्याकडे गेले. यावेळी त्यांनी २० ऐवजी ३५ टक्के रक्कम परत देण्याचे सांगीतले. यावेळी देखील मालती यांनी प्रस्ताव फेटाळला. यानंतर सन २०२० मध्ये पुन्हा हे दोघे मालती यांच्या घरी गेले. यावेळी त्यांनी थेट मालती यांना धमकी दिली. ‘तु मेलीस तरी तुझे पैसे मिळु देणार नाही, कंडारे आमचाच माणुस आहे’ या भाषेत त्यांनी मालती यांना धमकावले. यानंतर मालती यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी आळंदी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार अवसायक कंडारे, संबधित बीएचआरचे पदाधिकारी व दलाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.