जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात जबाब घेण्यासाठी आलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मागील चार दिवसापासून जळगावात ठाण मांडून होते. शेवटच्या दिवशी अमळनेर, जामनेर, धुळे येथील ५ ते६ जणांचे जबाब नोंदवल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मागील चार दिवसापासून जळगावात ठाण मांडून होते. या पथकाने मागील चार दिवसात साधारण १०० साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याचे कळते. जबाब घेण्यासह पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध बँकांमध्ये भेटी दिल्यात. त्यात २२ बँकांना समजपत्र तर ६ बँकांना स्मरणपत्र देण्यात होती. यातील एका बँकेने तात्काळ माहिती दिली. तर काही बँकांनी दोन दिवसात माहिती देण्याचे आश्वासन दिले होते.
दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातील विविध शासकीय कार्यालयातील पत्रव्यवहारांसह प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या. साक्षीदारांच्या जबाबातून अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली असल्यामुळे पोलीस तपासाला बळ मिळाले आहे. म्हणूनच गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने आर्थिक शाखेच्या पथकाचा हा जळगाव दौरा महत्वपूर्ण ठरलाय. दरम्यान, पुढील काही दिवसात आणखी काही मोठ्या घडामोडी शक्यता वर्तवली जात आहे.