जामनेर (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज राज्यभर अटकसत्र राबून तब्बल १२ संशयित आरोपींना अटक केली आहे. अटकेत असलेल्या व्यक्तींमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन कट्टर समर्थकांचा समावेश असल्यामुळे त्यांच्या गोटात थरथराट पसरलेला आहे. अनेक कार्यकर्ते एकमेकाला फोन करून नेमकी कुणा कुणाला अटक झालीय? याची खात्री करून घेताय. तर दुसरीकडे जामनेरातून १० ते १२ जण रफू चक्कर झाल्याचे कळते. दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे चर्चेला एकच उधान आले आहे.
पुण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपींचे जामीन होत असतानाच दुसरीकडे आज पहाटे मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यभर अटकसत्र राबविले. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील जितेंद्र रमेश पाटील व छगन झालटे हे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जातात. एवढेच नव्हे तर, महाजन यांचे अनेक महत्वाचे व्यवहार देखील दोघं सांभाळत असल्याची चर्चा आहे. जामनेरात आज सकाळी बीएचआर घोटाळ्याच्या अटक सत्राची बातमी समोर येताच खळबळ उडाली. अनेकांनी पत्रकारांना फोन करून सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. अगदी थोड्या वेळातच जितेंद्र रमेश पाटील व छगन झाल्टे यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब होताच, आ. महाजन यांच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले.
अगदी काहींनी तर भीतीपोटी जामनेरातून काढता पाय घेतला. काहींनी तर वकिलांचे सल्ले घ्यायला सुरु केल्याचेही कळते. थोडक्यात जामनेरात आजच्या अटक सत्रानंतर चर्चांना उधान आले आहे. अगदी अमुकलाही अटक झाली का?, याची विचारणा नागरिक एकमेकाला करत आहेत. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यात तपास मंदावातोय की काय?, अशी चर्चा सुरु होत नाही, तोच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने आज राज्यभरातून तब्बल १२ आरोपींना अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नवटके मॅडमांनी एकाच वेळी विविध शहरात पाठवलेल्या १५ पथकांचे नेतृत्व करत हे धाडसी अटकसत्र राबवले.
















