जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला हायकोर्टाने आज पुन्हा जोरदार झटका दिला आहे. न्यायालयाने झंवरला अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतल्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सुनील झंवरने मुंबई उच्च न्यायालयात २ मार्च रोजी अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने त्याला १५ दिवसांचे अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच या १५ दिवसाच्या काळात पुणे कोर्टातून अटकपुर्व जमीन घ्यावा,अशी सूचना केली होती. परंतू १५ दिवसांची मुदत संपल्यानंतरही झंवरने सेशन कोर्टातून जामीन न घेता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन दाखल केला होता. त्यावर बुधवारी न्यायालयाने झंवरला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर झंवरने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत पुन्हा एकदा १५ दिवसांचे संरक्षण मागीतले होते. परंतू न्यायालयाने ती मागणी फेटाळुन लावली. एवढेच नव्हे तर मागील दिलेले संरक्षण देखील आज काढून घेतले.
न्यायालयाने संरक्षण काढून घेतल्यामुळे सुनील झंवर पुन्हा एकदा कायदेशीररित्या बेपत्ता आरोपी झाला आहे. दरम्यान, पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने मागील वर्षी २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करुन पाच जणांना अटक केली होती. यांनतर झंवरचा मुलगा सूरज याला २२ डिसेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित सुनील झंवर, जितेंद्र कंडारे हे दोघे बेपत्ता आहेत. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण व त्रयस्त अर्जदार म्हणून अॅड. अक्षता नायक काम पाहत आहेत. दरम्यान, आता झंवरचे संरक्षण काढुन घेतल्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा त्याचा शोध सुरू केला आहे.