जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर आणि त्याचा मुलगा सुरज झंवर यांनी पिंपळे गुरव, निगडी,घोले रोड पुणे येथील बीएचआरच्या मालमत्ता इतर आरोपींशी संगनमत करून कमी किमतीत खरेदी केल्या. तसेच मालमत्ता खरेदीची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक असतांना त्यांनी मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या. धक्कादायक म्हणजे या मालमत्ता घेतांना ज्या ठेवीदारांच्या ठेवी वर्ग झाल्या होत्या. त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर सुनील झंवरने दादागिरी दाखवून आणि धमकावून कागदपत्रावर ठेवीदारांच्या सह्या व अंगठे घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
बीएचआर पतसंस्थेचे सिटी सर्वे नं. ५०/१/१, शॉप नं. ४, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड पुणे, ही मालमत्ता बीएचआर संस्थेने सन २०१२ मध्ये रु. ६ कोटी ३० लाख या किमतीत खरेदी केली होती. सुनील झंवरने सदरची मालमत्ता इतर संशयित आरोपींशी संगनमत करून ती सालासर कंपनीमधील पूर्वाश्रमीचा भागीदार योगेश लढ्ढाच्या नावे रू. ४९,९९,९९९/- किमतीस खरेदी केली. सदरची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक असतांना झंवरने या खरेदी व्यवहारात रु. ३१,४४,६९३/- च्या मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या.
साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी अशा नावाने टेंडर भरल्याचे भासवून बीएचआर पतसंस्थेचे कोहिनूर आर्केड ब्लॅक लँड नं. २, निगडी, ता. हवेली येथील शॉप नं. १६, १७, १८, व १८ ए ही मालमत्ता बीएचआर संस्थेने सन ३०१० मध्ये रू. ७ कोटी या किमतीस खरेदी केली होती. सुनील झंवरने सदरची मालमत्ता इतर संशयित आरोपींशी संगनमत करून रू. २,११,११,१११/- या किमतीस खरेदी केली. सदरची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक असताना झंवरने या खरेदी व्यवहारात रू. १,४९,८८,८८९/- च्या मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या.
बीएचआर पतसंस्थेचे रानडे निवास, बालगंधर्व चौक, घोले रोड पुणे येथील चार व्यापारी गाळे ही मालमत्ता बीएचआर संस्थेने सन २०१० मध्ये रू. ८ कोटी या किमतीस खरेदी केली होती. सुनील झंवरने ही मालमत्ता इतर संशयित आरोपींशी संगनमत करून ती रू. ३,११,३३,१११/- किमतीस खरेदी केली. सदरची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक के असताना झंवरने या खरेदी व्यवहारात रू. २,२१,०४,५०९/- च्या मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या. एवढेच नव्हे तर वरील मालमत्तेमध्ये ज्या ठेवीदारांच्या ठेवी वर्ग झाल्या आहेत, त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर झंवरने दादागिरी आणि धमकावून कागदपत्रावर ठेवीदारांच्या सह्या व अंगठे घेतल्या आहेत.
विजय वाघमारे (9284058683)